त्र्यंबकेश्वर : भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. त्यांनी अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला भेट दिली.मुंबई राखीव पोलीस बलाचे समादेशक असलेले पाटील यांची नाशिक ग्रामीणच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. जिल्ह्यातील कायम गर्दीचे ठिकाण असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर देशातील इतर मंदिरांसह गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. त्र्यंबकेश्वर दर्शनाची लागलेली आस व मंदिर पाहण्याची उत्सुकता प्रत्येक भाविकाला असते. त्याप्रमाणे नूतन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरास भेट दिली. सोमवार असल्याने पालखी कुशावर्त तीर्थ येथे गेली होती. देवास स्नान घालून पालखी मंदिरात आणण्यात आली. कोठी संस्थानमध्ये देवाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा रत्नजडित मुकुटाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले होते. पाटील यांचे देवस्थानचे विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांनी स्वागत केले. यावेळी व विश्वस्त व पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:21 AM