विरगाव : दसाणा धरणाचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्याच्या कामाला अखेर यश आले आहे. लोकसहभागातून तसेच विरगाव येथील शेतकरी वर्गांच्या सहकार्यातून हा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे विरगाव, वनोली, तरसाळी व औंदाणे येथील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतीला जीवदान मिळणार आहे.बागलाण तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या दसाणा लघुमध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ७९ दलघफु असून दरवर्षी हा प्रकल्प काठोकाठ भरून ओसांडत असतो. या प्रकल्पातून दरवर्षी कान्हेरी नदीपात्राद्वारे लाखो लिटर पाणी वाहून जात असते. हेच पुरपाणी विरगाव येथील ब्रिटिशकालीन पाटाद्वारे सुकड नाल्यात टाकून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांचा पाणीप्रश्न सोडवावा अशी मागणी या परिसरातून केली जात होती. यासाठी खालील गावातील शेतकरी वर्गाने अनेक वेळा संबंधित विभागाकडे लेखी मागणीही केली होती. मात्र यात समाधानकारक तोडगा निघत नसल्याने डोळ्यासमोर वाहून जाणारे पुरपाणी पाहण्याशिवाय या भागातील जनतेला गत्यंतर नव्हते. चालू वर्षी मात्र तरसाळी व औंदाणे या गावातील शेतकरीवर्गाने याप्रश्नी समाधानकारक तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला असता विरगाव येथील शेतकरीवर्गांचे मन वळविण्यात अखेर त्यांना यश आले आहे. यासाठी विरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, तरसाळीचे प्रगतिशील शेतकरी सुधाकर पाटील, तुषार खैरणार आदींसह गावागावातील शेतकरी वर्गांची शिष्टाई कामी आली आहे. संपूर्ण तालुक्याभरात गत महिनाभरापासून संततधार चालू असून कान्हेरी नदीला सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पुरपाणी चालू आहे. यातूनच गत महिन्याभरापासून हे पुरपाणी लोकसहभागाच्या जोरावर सुकड नाल्यात टाकण्यात आले असून यातून वनोली येथील खडक्या बंधाऱ्यासह विरगाव तसेच तरसाळी येथील लोकसहभागातून तयार करण्यात आलेले नालाबांध भरले गेले आहेत. शनिवारपासून हे पुरपाणी औंदाणे गावाकडे मार्गस्थ झाले आहे. कुठलीही शासकीय मदत न घेता हा नदी जोड प्रकल्प स्थानिक शेतकरीवर्गाने यशस्वी करून दाखविला आहे.
लोकसहभागातून दसाणा धरणाचे पुरपाणी अखेर सुकड नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:29 PM