नाशिक : खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव वाढल्याने शिधापत्रिकाधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने रेशनमधून ५५ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला असला तरी, प्रत्यक्षा महिना उलटूनही जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे दर्शन झालेले नाही. पणन महामंडळाकडे तूरडाळ पुरविण्याची जबाबदारी असल्याने शासनाने गेल्या वर्षी खरेदी केलेल्या तुरीच्या भरडाईचे काम सुरू असल्याने ज्या-ज्या प्रमाणात भरडाई होईल त्या-त्या प्रमाणात तूरडाळ उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगण्यात आले.राज्य सरकारने गेल्यावर्षी संपूर्ण राज्यातून ३० लाख क्विंटल व नाफेडने २५ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. या तुरीला आता एक वर्ष पूर्ण झाले असून, गुदामांमध्ये ती खराब होण्यापेक्षा सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त भावात वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर महिन्यापासून प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ५५ रुपये किलो या भावाने प्रत्येकी एक किलो तूरडाळ देण्याचे ठरविण्यात आले होते. तशी मागणीही प्रत्येक जिल्ह्याकडून घेण्यात आली व रेशन दुकानदारांकडून तूरडाळीचे चलनही भरून घेण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यासाठी ४९२७ क्विंटल तूरडाळ मंजूर करण्यात आली होती. जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांची संख्या सव्वासात लाख इतकी असताना शासनाने मंजूर केलेली तूरडाळ अपुरी पडणार असल्याने ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वाने रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना एक किलो तूरडाळीचे वितरण करण्याचे आदेश पुरवठा खात्यानेदिले होते. प्रत्यक्षात पणन महामंडळाकडून महिना उलटूनही तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. डिसेंबर महिन्यातफक्त नाशिक, मालेगाव व नांदगाव या तीन तालुक्यांनाच फक्त साडेसातशे क्विंटल तूरडाळ मिळालेली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये तूरडाळ पोहोचलेली नसून रेशन दुकानदारांनी चलन भरल्याने त्यांचेही भांडवल अडकून पडले आहे. शासनाने डिसेंबर महिन्यातच तूरडाळ विक्रीचा निर्णय घेतला होता, त्यामुळे जानेवारीत ती विक्री करता येईल काय, असा पेचात टाकणारा प्रश्नही नव्याने उपस्थित झाला आहे.
चार तालुक्यांनाच पुरवठा : भरडाईत पणन व्यस्त तूरडाळीची अद्याप प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:53 AM