गंगापूर : रविवारी गोदावरीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या गंगापूर, आनंदवली, सावरकरनगर परिसरातील पूरग्रस्तांना नाशिक महापालिकेच्या शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याने सोमवारी प्रभाग सभापती संतोष गायकवाड व नगरसेवक विलास शिंदे यांनी त्यांच्या जेवणाची व अन्य साधनसामग्रीची व्यवस्था केली.रविवारच्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून हजारो क्यूसेस पाणी गोदावरी नदीला सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी काठावरील आनंदवली, गंगापूर शिवारातील शिवनगर, बजरंगनगर, नवश्या गणपती, स्वामी विवेकानंदनगर, सावरकरनगर, नरसिंहनगर, संत कबीरनगर या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे व पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाधित कुटुंबीयांना मनपाच्या आनंदवली शाळेत सुरक्षितस्थळी हलविले होते. सोमवारी सकाळी स्थानिक नगरसेवक विलास शिंदे, प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड यांनी सावरकरनगर, नरसिंहनगर, पाटीलनगर, नवश्या गणपती परिसर, बजरंगनगर, संत कबीरनगर, स्वामी विवेकानंदनगर आदी भागातील पूरपरिस्थितीची पाहणी करून बाधित झालेल्यांची चौकशी करून त्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.पूरग्रस्त बाधितांची संख्या पाहता, त्यांना बचाव मदत कार्य करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडल्याने त्यांचे हाल झाल्याबद्दल नगरसेवक विलास शिंदे यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. तसेच प्रशासनाकडून त्यांची व्यवस्थित सोय लावण्याबाबत हयगय झाल्याचेही त्यांना नमूद केले.मंगळवारपासून रहिवासाची चिंताबजरंगनगर, रोकडे मळा येथील नुकसानग्रस्तांची आनंदवलीच्या मनपा शाळा क्र. १८ मध्ये निवास व्यवस्था करून दिली. मात्र मंगळवारपासून शाळा पुन्हा भरणार असल्याने या पूरग्रस्तांना पुन्हा कुठे स्थलांतरित करावे लागेल, असा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींना सतावत आहे. मंगळवारपर्यंत त्यांची नुकसानग्रस्त घरे राहण्याइतपत दुरुस्त न झाल्यास या नागरिकांना पुन्हा स्थलांतरित करावे लागणार नाही.
आनंदवली पूरग्रस्तांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:32 AM