नाशिक : ‘मी टू’ मोहिमेला माझा पाठिंबा आहे. या मोहिमेचे मी स्वागत करते. ‘मी टू’ मोहीम हे एक वादळ आहे. मंथन होत आहे. या मंथनातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. बायका हिंमत करून पुढे येत आहेत. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांनीही या मोहिमेत सहभागी होत व्यक्त व्हायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. बुधवारी (दि.१७) कालिदास कलामंदिर येथे ‘संकल्प स्त्रित्वाच्या सन्मानाचा’ या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ‘मी टू’ मोहिमेतील आरोपांचे पुढे काय होणार? या प्रश्नावर ‘काय खरे आहे-काय खोटे आहे ते लवकरच समजेल. पण महिला पुढे येऊन त्याबद्दल बोलत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या देशात घडत असलेली ही क्रांती आहे. त्यामुळे ‘मी टू’त व्यक्त होणाऱ्या गोष्टी नीट ऐकून घ्यायला हव्यात. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले तरी ते त्यांच्यासाठी खूप आहे. या महिलांना पाठिंबा दिला पाहिजे’ असे आवाहन फडणवीस यांनी केले. शबरीमला प्रकरणाविषयी त्या म्हणाल्या, या देशात सर्वांना समान हक्क आहे. मग ते पुरुष असो वा महिला, त्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे. दर्शन घेता आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.जनजागृती व्हावी‘सॅनिटरी नॅपकिनच्या वापरात देशाची स्थिती’ याबाबत त्या म्हणाल्या, आपल्या देशात ८० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाही. ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. याची जनजागृती झाली पाहिजे. असे कार्यक्रम देशभर झाले तर नक्कीच हा प्रश्न सुटू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.