निफाड : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच पशुपक्ष्यांवरही झाला आहे. आपला अधिवास - वाट चुकलेल्या एका पोपटाला तालुक्यातील शिवरे येथील एका शेतकऱ्याने अन्नपाणी दिल्याने या पोपटाने चक्क आता या शेतकºयाच्या शेतातील घरासमोरील झाडावरच मुक्काम ठोकला आहे. विशेष म्हणजे पोपटाला या शेतकºयाच्या कुटुंबाचा लळा लागला असून, शेतकºयाने इशारा करताच तो झाडावरून खाली अंगणात येत असतो.निफाड तालुक्यातील शिवरे येथील वाल्मीक एकनाथ सोनवणे हे शेतात वस्ती करून राहतात. दि. १५ मे रोजी त्यांचे कुटुंबीय घराबाहेर बसलेले असताना त्यांच्यासमोर एक पोपट आला आणि त्यांना सुखद धक्का बसला. कारण बºयाच वर्षांपासून या तालुक्यात पोपटाचे दर्शन दुर्लभ झाले आहे. यात अशा पद्धतीने पोपट समोर आल्याने विशेष वाटले.सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला फळे व पाणी दिल्याने पोपटाने त्यावर ताव मारला. त्यानंतर सोनवणे यांना वाटले काही वेळाने पोपट निघून जाईल; परंतु दुसºया दिवशी हा पोपट सोनवणे यांच्या घराजवळच्या झाडावर बसलेला दिसला. त्यानंतर सोनवणे यांच्या कुटुंबाने पुन्हा खायला अन्न दिले, पिण्यासाठी पाणी ठेवले आणि पोपटाने पुन्हा आपली भूक भागवली. त्यामुळे या पोपटाला सोनवणे कुटुंबाचा लळा लागला आहे.पोपट झाडावर जरी बसलेला असला तरी त्याला आंबा व इतरफळे दिली जातात. पिण्याचेपाणी मिळावे म्हणून झाडावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.--------------------------बदामाच्या झाडावरच ठिय्याविशेष म्हणजे सोनवणे यांच्या घराजवळ पेरू, आंबा व अंजिराचीझाडे आहेत. दिवसभर पोपट त्यांच्या शेताच्या आसपासच्या याझाडांवर फिरत असतो. आंबा, पेरू, अंजीरची फळेही खात असतो;मात्र रात्री त्यांच्या घराजवळच्या बदामाच्या झाडावर आधार घेऊन त्याचा मुक्काम असतो. गेल्या सहा दिवसांपासून दररोज सोनवणे कुटुंब पोपटाची भूक भागवत आहे. शिवाय पोपटही आसपासच्या झाडांवरील फळांवर ताव मारीत आहे. लॉकडाउनच्या काळात वाट चुकलेल्या पोपटाला आधारदेत भूतदया जपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सोनवणे कुटुंबाचे कौतुक होत आहे.------------------------निफाड तालुक्यात पूर्वी ज्वारी, बाजरी, खोंडे आदी पिके घेतली जायची. पेरूच्या बागा भरपूर होत्या. यामुळे पोपटांची भूक भागली जायची. त्यामुळे पोपटांची संख्या भरपूर होती. शिवाय या तालुक्यात जुनी मंदिरे, वाडे होते. या मंदिरात, वाड्यात वरच्या बाजूला बिळासारख्या भागात पोपटांना राहायला जागा होत्या. काही वर्षांपासून जुनी मंदिरे, जुने वाडे पाडून नवीन मंदिरे, घरे बांधली गेली. त्यांना अधिवास करता येईल अशी जागा राहिली नाही. या सर्व कारणांमुळे पोपटांची संख्या निफाड तालुक्यात कमी झाली आहे.- डॉ. उत्तम डेर्ले, पक्षिमित्र, निफाड