नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी समर्थन केले आहे. विशेष म्हणजे भाजपाने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून, त्याच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, भाजपची मातृसंस्था म्हणविणाऱ्या आरएसएसचे वक्ते इंद्रेश कुमार यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी त्यांनी सत्य परिस्थिती कथन केल्याचे मत व्यक्त करीत नव्याने या वादाला तोंड फोडले आहे.मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना नाशकात ते बोलत होते. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरील आक्षेपांवर बोलताना निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज वैध ठरविला असल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञा यांची सहा पैकी चार आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली असून, दोन आरोपांमध्ये त्या जामिनावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या चार ते पाच वर्षांत देशात सहिष्णुतेचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा केला.धार्मिक भावना दुखावल्या नाहीदेशात गेल्या काही दिवसांमध्ये कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसल्याचे इंद्रेश कुमार यांनी कार्यशाळेत सांगितले मात्र एका तरुणाने त्यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. आपल्याकडे गेल्या दोन महिन्यांतच काही ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी इंद्रेश कुमार यांनी गेल्या पाच वर्षांतील विविध घटनांचा दाखला देत देशात सकारात्मक बदल होत असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मात्र बगल देत त्यांनी देशात सहिष्णुतेचे वातावरण वाढले असून, गेल्या पाच वर्षांत जातीय दंगलींचे प्रमाण घटल्याचा दावाही केला.‘मिशन शक्ती’तून समरसतेचा संदेशराष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनाही इंद्रेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘मिशन शक्ती’ माध्यमातून समरसतेचा संदेश देताना जात-पात व कटरता मुक्त सन्मान आणि सहकार्याची भावना असलेला भारत निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी न्यू भारत फाउंडेशनच्या रेशमा एच. सिंह, लेखक तथा चित्रपट निर्माता अभिनव सिंह कश्यप उपस्थित होते.
साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:30 AM