नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाद ठरविलेली चार मते वैध ठरवित या निवडणुकीतील पराभूत सेना उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांना आमदार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या स्थगितीने राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांना दिलासा मिळाला असून, पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. १३ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश केतकर यांनी शिवाजी सहाणे यांच्या बाजूने निकाल देत त्यांना आमदार म्हणून घोषित करतानाच जयंत जाधव यांना या निकालाविरुद्ध सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार जाधव यांनी गेल्या आठवड्यातच सर्वाेच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती फकीर महंमद इब्राहिम खलीपऊल्ला व न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जयंत जाधव यांनी दाखल केलेल्या अपिलात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणीत ज्याप्रमाणे शिवाजी सहाणे यांची चार मते बाद ठरविण्यात आली तसेच आपलेही सात मते बाद ठरविण्यात आले होते. त्या मुद्यावर सहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने चार बाद मते मोजून ती वैध ठरवून सहाणे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र आपलीही सात बाद मते मोजण्यात यावीत ही नैसर्गिक मागणी न्यायालयाने नाकारली परिणामी आपल्याला मत देणाऱ्या सात मतदारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली असून, उच्च न्यायालयाचा निकाल नैसर्गिक न्यायाला धरून नाही. या अपिलावर सुनावणी होऊन जाधव यांच्या वतीने अॅड. नागेश्वर राव व गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद केला, तर सहाणे यांच्या वतीने अॅड. वेणू गोपाल यांनी म्हणणे मांडून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगून जाधव यांचे अपील फेटाळून लावावे, अशी विनंती केली. परंतु न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देत पुढील सुनावणी घेण्याचे जाहीर केले. २५ मे २०१२ रोजी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने अॅड. शिवाजी सहाणे, तर राष्ट्रवादीकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी करणारे आमदार जयंत जाधव उमेदवार होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पेरियास्वामी वेल्लरासू यांच्यासमोर झाली. यावेळी त्यांनी दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे २२१-२२१ मते मिळाल्याने टाय झाला, जिल्हाधिकाऱ्यांनी चिठ्ठी पद्धतीने कौल घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन्ही उमेदवारांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्यानंतर सहाणे यांची चिठ्ठी निघाली. परंतु ज्याच्या नावाची चिठ्ठी शिल्लक राहिली तोच उमेदवार विजयी असल्याचे सांगून वेलरासू यांनी जयंत जाधव यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यासंदर्भात अॅड. सहाणे यांनी १९ जून २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. --इन्फो---------------- न्यायदेवतेवर विश्वास न्यायदेवतेवर आपला विश्वास कायम असून, तो कालही होता. मुंबई उच्च न्यायालयानेच यापूर्वी निकाल देताना आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाला आपली बाजू रास्त वाटल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली. आता जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू. - जयंत जाधव, आमदार
सहाणेंच्या आमदारकीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती जयंत जाधव यांना दिलासा : बाद मते मोजण्यावर होणार विचार
By admin | Published: February 21, 2015 12:53 AM