नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची जवळीक वाढू लागली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे-राष्ट्रवादी युती होण्याचीही चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्ही पक्षांच्या वाढलेल्या जवळीकमुळे नेत्यांच्या भाषणातही याची प्रचिती येते.
नाशिकमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंचे केलेले कौतुक हे आगामी विधानसभेसाठी मनसेला घातलेली साद आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, राज्यात सगळीकडे पक्षबदलाचं वारं वाहू लागलं आहे. आमच्याकडे सत्ता असो वा नसो मात्र प्रत्येक टीव्ही चॅनेलच्या हेडलाइन्समध्ये दोनच पक्ष चर्चेत असतात. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर दुसरा राज ठाकरेंचा मनसे.
ज्यांच्याकडे एकही आमदार नाही खासदार नाही तरीही टीव्हीवर फक्त राज ठाकरे झळकतात. सरकारच्या विरोधात प्रचंड प्रमाणात बोलल्यामुळे त्यांना ईडीची नोटीस आली. त्यांच्यावर नेहमी आरोप होतो की मनसेकडे एकही आमदार नाही, खासदार नाही पण राज ठाकरे खणखणीत नाणे आहेत त्यामुळे ईडीची नोटीस आल्यापासून 72 तास टीव्हीवर फक्त राज ठाकरे दिसत होते. कृष्णकुंजवरून निघाल्यापासून ईडी कार्यालयात पोहचेपर्यंत त्यांचीच बातमी होती. घरातल्या सर्वसामान्य महिलेलाही उत्सुकता होती. दुसऱ्यांची चौकशी होते मात्र एवढी उत्सुकता कोणासाठी असते का? तर नव्हती असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
तसेच पक्षाची पडझड झाली तरी हेडलाइन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे पक्ष असतात. ब्रेकिंग न्यूज बघून भीती वाटते. डीबेट शोमध्ये भांडणं सुरू असतात. त्याने डोके दुखते. आम्ही सिरियल बघतो, माझ्या महाराष्ट्रातील बेरोजगारी, गरिबी, भ्रष्टाचार यावर चर्चा होऊ शकत नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. पक्ष बदलणाऱ्यांना टोला लगावताना त्यांनी सांगितले की, पक्ष बदलणं म्हणजे मोबाईलची स्कीम बदलण्यासारखं झालं आहे. रिजेक्ट मालाचं पॅकेज बदललं म्हणून तुम्ही घेणार का? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.