नाशिक : केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासालादेखील गती मिळणार आहे. सूरत-चेन्नई हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जाणार असून, त्यामुळे नाशिककरांचा नाशिक-सूरत हा प्रवासदेखील अवघ्या दोन तासांत होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ९९५ हेक्टर जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी भूसंपादन करण्यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.५) बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सूरत-चेन्नई महामार्गाची घोषणा केली होती. महाराष्ट्रातून नाशिक, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या असून, या मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासालादेखील हातभार लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ६९ गावांमधून जाणाऱ्या या मार्गासाठी भूसंपादन करण्याची महत्त्वाची भूमिका जिल्ह्याला पार पाडावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे. सहा तालुक्यांतील ६९ गावांतील जमीन त्यासाठी भूसंपादित केली जाणार आहे. एकूण ९९५ हेक्टर जमीन जिल्हा प्रशासनाला अधिग्रहित करावी लागणार आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केेले जाणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. या महामार्गासाठी एकूण ७० ते ७५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. येत्या तीन वर्षांत या महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
--इन्फो--
या सहा तालुक्यांतून जाणार ग्रीनफिल्ड
सुरगाणा : बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, राक्षसभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दड, पिंपळचोड, संबरकहाळ
दिंडोरी : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे, जांबुटेक, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबे, दिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहुर
पेठ : पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव
नाशिक : आडगाव,ओढा, विंचूर गवळी, लाखलगाव,
निफाड : चेहडी खु, चाटोरी वर्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव, निपाणी
सिन्नर : देशवंडी, पाटपिंप्रि, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्रि, गुळवंच, देवपूर, खोपडी बु., धारणगाव, फर्दापूर, पांगरी बु., भोकणी, पांगरी खु., फुलेनगर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी