सुरगाणा (नाशिक): गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात असलेल्या सापुतारा घाटात रविवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पर्यटकांची खासगी लक्झरी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून बस कठडा तोडून दरीत गेली. या बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुरत येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.
सापुतारा हे गुजरात राज्यातील व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील एक पर्यटन स्थळ असल्याने विकेंडला याठिकाणी मोठी गर्दी असते. सध्या पावसामुळे परिसरातील निसर्ग बहरला आहे. त्यामुळे पर्यटकांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुरतच्या पर्यटकांना घेऊन आलेली लक्झरी बस परतीच्या मार्गावर असताना राष्ट्रीय महामार्गावरील सापुताराजवळील घाटात संरक्षक कठडा तोडून खाली कोसळली. चालक एका ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या एका टेम्पोपासून वाचविण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटले.
या अपघातात एक ८ वर्षाचा मुलगा व दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच सापुतारा येथील अनेक रूग्णवाहिका व पोलिसांचे पथकही दाखल झाले. जखमींना शमगवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्यातील पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.