नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात नाशिक - सुरत अंतर केवळ १७६ किलोमीटरवर येणार असल्याने दोन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी प्रचंड वेगवान होऊ शकणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ तालुके आणि ६९ गावांमधून जाणाऱ्या या प्रस्तावित महामार्गामुळे या सहाही तालुक्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकणार असल्याचे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंंडियाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी सांगितले.
नाशिक सिटिझन फोरमतर्फे उंटवाडी येथील द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या हॉलमध्ये ‘सुरत-हैदराबाद’ या महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प सल्लागार राजू, व्यवस्थापक दिलीप पाटील तसेच ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी आणि आशिष कटारिया मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रस्तावित महामार्ग सहापदरी असणार आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्रातून हा महामार्ग ‘ग्रीन फिल्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार तयार होणार असल्याने पर्यावरणाची फारशी हानी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, फुड क्लब, लॉजेस्टिकसह इतर सुविधांमुळे रोजगारवृद्धीसही मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नाशिकच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.
सध्या सुरत ते चेन्नईसाठी देशात तीन महामार्ग आहेत. ते महामार्ग सुमारे १६०४, १६१४ आणि १५६७ किलोमीटर या महामार्गांची लांबी आहे. मात्र, सुरत ते हैदराबाद या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे अंतर सुमारे १२५० किलोमीटरपर्यंत येणार आहे. या संपूर्ण अंतरासाठी त्यासाठी दहा तासांचा अवधी लागेल, तर नाशिकहून चेन्नईपर्यंत आठ तासांत पोहोचणे शक्य होईल. ग्रीन फिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नल-हैदराबाद- कडप्पा-चेन्नई असा मार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.
इन्फो
जिल्ह्यातील ६ तालुके कक्षेत
जिल्ह्यातील सहा तालुके या महामार्गाच्या कक्षेत आहेत. त्यात सुरगाण्यातील १२ गावे (१७ किमी), पेठमधील ५ गावे (६ किमी), दिंडोरीतील २३ गावे ( ४३किमी), नाशिक ४ गावे (१२ किमी), निफाडच्या ९ गावांचा (१३ किमी), तसेच सिन्नरच्या १६ गावांचा (३२ किमी) त्यात समावेश आहे. नाशिकमधून हा महामार्ग आडगाव, ओढा, विंचूर गवळी, लाखलगाव या भागातून जाणार आहे.