नाशिक : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती मंगळवारी (दि. २२) दुपारी अचानकपणे खालावल्याने त्यांना मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तीन तासांच्या उपचारानंतर जैन यांना पुन्हा नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. कारागृह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात असून गरज भासल्यास पुढील उपचारास मुंबईत हलविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणीत नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जैन यांना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानकपणे छातीत वेदना होऊ लागल्या आणि श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे कारागृह प्रशासनाने तत्क ाळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्यांच्यावर येथे उपचार करण्यात आले. त्यांना कमालीचा अशक्तपणा आला असून, उच्च रक्तदाब व रक्तातील वाढलेल्या शर्करेचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न येथील वैद्यकीय व्यवस्थापनाने केला.
त्यानंतर त्यांना कारागृह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा रुग्णालयातून पुन्हा कारागृहात नेण्यात आले. कारागृह प्रशासनाकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची परवानगी मिळाल्यानंतर त्यांना पुढील उपचारास मुंबईतील जे. जे. किंवा केईएम रुग्णालयात दाखल केले जाईल.
जैन यांच्या तपासणीत साखरेचे प्रमाण २९७ पर्यंत वाढल्याचे आढळून आले. तसेच रक्तदाबदेखील वाढलेला होता. श्वास घेण्यासही त्रास होत होता. वाढलेला रक्तदाब व शर्करेचे प्रमाण नियंत्रणात आणले; मात्र त्यांच्यावर यापूर्वी हृदयाची शस्त्रक्रियाही झाली असून, वयोमान बघता त्यांना पुढील उपचारासाठी जे. जे. किंवा केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.- डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक