नाशिक : पश्चिम विभागातील ७, १२ व २४ या तीन प्रभागातील वेगवेगळ्या १२ जागांवरून निवडणूक लढवित असलेल्या एकूण ५६ उमेदवारांपैकी प्रचारासाठी मंगळवारपर्यंत (दि.१४) सुरेश पाटील यांनी २ लाख ७२ हजार १८२ इतका सर्वाधिक खर्च केला. निवडणूक प्रचारासाठी सर्वाधिक खर्च करणाऱ्यांच्या यादीत सोमवारपर्यंत ९० हजार २८४ रुपये खर्च करणारे तुषार अहेर आघाडीवर होते. परंतु पाटील यांनी मंगळवारी एकाच दिवसात तब्बल दोन लाख रुपयांचा खर्च निवडणूक आयोगाला दाखल करून खर्च करणाऱ्यांच्या यादीत आघाडी घेतली आहे. महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होत असल्याने त्यावर निर्बंध राहावा म्हणून निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी ८ लाख रुपयांची मर्यादा घालून दिली आहे. तसेच रोज होणाऱ्या खर्चाचा तपशीलही निवडणूक कार्यालयात सादर करण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाला त्यांच्या प्रचारासाठी होणारा खर्च सादर करणे बंधनकारक आहे. तसेच हा सर्व खर्च उमेदवारांना बँकेच्या खात्यातून करावयाचा आहे. या खर्चाची पडताळणी करण्यासाठी निवडणूक शाखेने उमेदवारांना बुधवारी (दि.१५) दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिली होती. परंतु काँग्रेसच्या उमेदवार सुवर्णा गटकळ व रोशन जाधव यांनी त्यांच्या मंगळवारचा (दि.१४) खर्च सादर केला नसल्याने या दोन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. जाधव यांनी आतापर्यंत केवळ १० हजार रुपयांचा खर्च सादर केला आहे. (प्रतिनिधी)
पश्चिम विभागात सुरेश पाटील यांचा सर्वाधिक खर्च
By admin | Published: February 16, 2017 1:40 AM