नाशिक : सुरगाणा नगरपंचायतीच्या भाजपाच्या नगराध्यक्ष रंजना लहरे यांच्या कारभाराला कंटाळून भाजपा-शिवसेनेच्या ११ नगरसेवकांनी बुधवारी (दि. ५) जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे रंजना लहरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत असल्याचे निवेदन दिले.१७ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवकांनी हा अविश्वास ठराव आणल्याने तो संमत होण्याची चिन्हे आहेत. विशेषत: भाजपाच्या नगरसेवकांनीच शिवसेनेच्या नगरसेवकांना सोबत घेऊन भाजपा नगराध्यक्षांविरोधात अविश्वास आणल्याने भाजपात सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अविश्वास ठरावावर भाजपा गटनेते जयश्री तेजोळे, शिवसेना गटनेते भारत वाघमारे यांच्यासह भाजपाचे पाच नगरसेवक सुरेश गवळी, ज्ञानेश्वर कराटे, योगिता पवार, रेश्मा चौधरी, शोभाताई पिंगळे यांच्या तसेच सचिन अहेर, तृप्ती चव्हाण, पुष्पाताई वाघमारे व शेवंता वळवी या शिवसेनेच्या चार अशा एकूण अकरा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी आता जिल्हाधिकारी लवकरच सुरगाणा नगरपंचायतीची विशेष सभा बोलविण्याची शक्यता आहे. याच सभेत भाजपा नगराध्यक्ष रंजना लहरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर होऊ शकतो. अविश्वास ठराव आणण्यामागे मनमानी कारभार करणे, कोणाचेही न ऐकणे यांच्यासह विविध कारणांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
सुरगाणा नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल
By admin | Published: April 06, 2017 2:31 AM