नाशिक : अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून बिहारमध्ये घेऊन जाणारा आरोपी अब्दुल जाहिरोद्दीन शेख (२१, रा़ कातिहार, जिल्हा किसन गंज, बिहार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि़२४) दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील योगेश डी़ कापसे यांनी या खटल्यात सहा साक्षीदार तपासून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़
यात्रेतील साहसी प्रकार असलेल्या ‘मौत का कुॅँआ’ मध्ये आरोपी अब्दुल शेख हा दुचाकी चालवित होता़ २०१७ मध्ये सुरगाणा तालुक्यातील गावामध्ये असलेल्या यात्रेत अल्पवयीन आदिवासी मुलगी खेळ पाहण्यासाठी गेली होती़ शेख व आदिवासी मुलीची ओळख झाल्याने त्याने या मुलीला बिहारला पळवून नेले होते़ मुलीच्या पालकांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविल्यानंतर या मुलीचा तपास सुरू करण्यात आला होता़ कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तब्बल महिनाभरानंतर या मुलीला बिहार येथून शोधून आणले होते़
न्यायाधीश देशमुख यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील कापसे यांनी दिलेल्या पुराव्यावरून शेख यास दोषी ठरविण्यात आले़ त्यास अपहरणाच्या गुन्ह्याखाली दीड वर्ष सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पाच दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली़