खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. ३७ किमीच्या पुढील टप्प्यातील कालवा हा खामखेडा व सावकी गावाच्या पूर्णत: डोंगराळ भागातून गेलेला आहे. कालव्यातून पाणी मिळत नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना तसेच जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. खामखेडा व सावकी गावातील सुळे डावा कालवा ३७ ते ४२ किमी बारमाही करावा, खामखेडा तसेच सावकी शिवारातील पाझर तलावात पावसाळ्यातील पूरपाणी तलावात साठवण्यासाठी याठिकाणी कालव्यांना गेट बसवण्यात यावे तसेच या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ३७ किमीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कालव्याची गळती होते, याबाबत आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली खामखेडा व सावकी येथील सरपंचासह सदस्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले होते. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन हे देवळा तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी सुळे डाव्या कालव्याच्या कामाची पाहणी केली.याबाबतीत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकºयांना दिले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, देवळा जि.प.सदस्या धनश्री आहेर, देवळ्याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर, पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख, पंकज निकम आदीसह शेतकरी उपस्थित होते.--------------------पुनंद धरणातून सुळे डाव्या कालव्याद्वारे पिळकोस (ता. कळवण) गावाच्या ३७ किमी हद्दीपर्यंत कालव्याला बारमाही पाणी मिळते. पिळकोस गावापासून ३७ किमीच्या पुढील ४२ किमीच्या टप्प्यात खामखेडा व सावकी गावातील कालव्याला फक्त पावसाळ्यातच पूरपाणी दिले जाते. खामखेडा व सावकी गावातून जवळजवळ पाच किमीहून अधिक सुळे डावा कालवा वाहतो. मात्र पावसाळ्यातील पूरपाणीच या कालव्यातून शेतकºयांना मिळते. त्यामुळे जमिनी देऊनही कालव्याच्या माध्यमातून शेतकºयांचा फायदा होत नाही.
सुळे डाव्या कालव्याची जलसंपदामंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 1:07 PM