ओझरटाऊनशिप : येथील एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्था आयोजित "अवघा रंग एक जाहला" सुमधूर गीतांची मंगलमय दीपावली पहाट रंगली आणि श्रोत्यांनी गायकीला उत्स्फूर्त दाद दिली.भाजी मार्केट ओझरटाऊनशिप येथे पूर्वा क्षीरसागर व सहगायिका बागेश्री क्षीरसागर यांच्या सुमधूर गीतांनी दीपावली पहाट मैफील रंगली. उपस्थित श्रोत्यांनी सदाबहार हिंदी, मराठी, भावगीत व भक्तीगीतांचा मनमुराद आनंद लुटत उत्तम प्रतिसाद देत गायकांचा उत्साह वाढविला.याप्रसंगी एच. ए. एल.चे सीईओ डी. मैती, जनरल मॅनेजर दीपक सिंघल, जनरल मॅनेजर साकेत चतुर्वेदी, सीओपीचे संजय पालवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी डी. मैती यांनी उपस्थित श्रोत्यांना प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष लाबा मेहेर, उपाध्यक्ष रवी टेलर, सरचिटणीस लक्ष्मीकांत खैरनार, खजिनदार सौरभ करंबेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र वाळुंज, कमलाकर साळवे, गोपाल भगत, देविदास शिंदे, योगेश बागुल, प्रशांत काठे, अनुप खैरनार, मनोहर ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.फायर शो रद्दएच. ए. एल. व्यवस्थापन व एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्थेने या वर्षीही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे गेल्या २५-३० वर्षांपासून सुरू असलेला फायर-शो चा कार्यक्रम रद्द करण्यात आला. एच. ए. एल. वसाहतीतील सर्व रहिवासी यांनी भरभरुन प्रतिसाद देत फटाके न फोडता दीपावली पारंपरिक पद्धतीने पूजन करून साजरी केली.