पिंपळगाव वाखारी : कोलदरवस्ती येथे नव्याने बांधकाम केलेल्या प्री-काँक्रीट पद्धतीच्या अंगणवाडीत सापांची वर्दळ वाढल्याने येणारे विद्यार्थी व पालक भयभीत झाले असून, अंगणवाडीत असणाऱ्या पोकळींच्या जागा बुजण्याची मागणी पालकांनी केली आहे.कोलदरवस्ती येथे नव्याने बांधकाम केलेली अंगणवाडी डोंगराच्या पायथ्याशी असून झाडे झुडपे अवतीभवती आहेत. प्री काँक्रीट पद्धतीने बांधलेल्या ह्या अंगणवाडीत बांधकामाला मोठ्या पोकळी आहेत. त्यात रात्रीच्या वेळी साप येऊन लपून राहत असल्याने सकाळी अंगणवाडी सुरू होताच विद्यार्थी हालचालीने साप पोकळीतून निघतात. गेल्या महिनाभरात अंगणवाडीत १५ सर्प निघाले. त्यात काही मोठे साप पळून जाण्यात यशस्वी होतात. सततच्या साप निघण्याच्या प्रमाणामुळे अंगणवाडी सेविका व विद्यार्थी भयभीत झाले. अनेक विद्यार्थ्यांनी अंगणवाडीत येणे बंद केले आहे. पालकांनी अंगणवाडी खोलीतील पोकळी बुजण्याची मागणी केली आहेत. याबाबत संबंधित बालविकास प्रकल्प कार्यालयाला माहिती देऊनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. (वार्ताहर)
कोदरवस्ती अंगणवाडीत सर्पांच्या वर्दळीने घबराट
By admin | Published: August 19, 2014 11:14 PM