नाशिक : शहरापासून लगतच असलेल्या मातोरी गावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिकांना जुलाब, वांत्या झाल्याच्या घटनेने प्रशासकीय यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली असून, पाण्याच्या टाकीची तत्काळ स्वच्छता करण्याबरोबरच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. दूषित पाण्यामुळे अत्यवस्थ असलेल्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दूषित पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी स्वच्छ करून शनिवारी गावकऱ्यांना नाशिक महापालिकेच्या सहा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मातोरी येथील पाण्याच्या टाकीतील पाण्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नऊ वेळा नमुने घेऊन तपासणी केली असता, सदरचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला होता, परंतु ग्रामसेवकाने त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच टाकीचे पाणी पिण्यासाठी सोडले, एवढेच नव्हे तर पाणी कमी पडले म्हणून न वापरात असलेल्या विहिरीचाही त्याने वापर केल्यामुळे ही घटना घडल्याचा निष्कर्ष प्राथमिक चौकशीत काढण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शनिवारी दुसऱ्या दिवशी या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी बालकृष्णन् राधाकृष्णन्, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गट विकास अधिकारी रवींद्र परदेशी यांनी मातोरीत ठाण मांडून परिस्थितीची पाहणी केली, त्याचबरोबर दोन वैद्यकीय पथकेही तैनात ठेवली. मातोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा करण्यात आला असून, तत्काळ मदतीसाठी दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत कमालीचा फरक पडला असून, काहींना उपचारानंतर घरीही सोडण्यात आले आहे. मातोरीला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनेही तत्काळ पावले उचलण्यात आले असून, एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी शनिवारी सकाळी साफ करण्यात आली, त्याचबरोबर ज्याठिकाणी गळती होती, ती रोखण्याचे कामही हाती घेण्यात आले आहेत.ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी सहा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जयश्री चुंभळे, आमदार योगेश घोलप आदिंनी भेट देऊन रुग्णांची तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. (प्रतिनिधी)
मातोरीत शासकीय यंत्रणेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 11:21 PM