चांदोरी : नाशिक शहर व ग्रामीण भागात तसेच इगतपुरी ,त्रंबकेश्वर भागात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणातून मोठया प्रमाणात सतत विसर्ग सुरू असल्याने शनिवार सकाळ पासून चांदोरीसह सायखेड्यात पूर पाणी गावात शिरायला सुरूवात झाली. ही पाणी पातळी क्षणाक्षणाला वाढत आहे. यामुळे हजारो पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.दुकाने व घरांमध्ये पाण्याचा शिरकाव सुरू झाला आहे. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महापूराचे पाणी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आले आहे. निफाडपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. नाशिककडे जाणारी वाहतूक ओझर मार्गाने वळविण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान चांदोरी गावातील मुख्य रास्ता पाण्याखाली गेला आहे. प्रवाहाला वेग असल्याने गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे. चांदोरी शिवारातील विठ्ठलवाडी येथे सात सदस्यांचे कुटुंब पाण्यात अडकले असतानाची माहिती मिळताच चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी बोट व लिव्ह जॅकेट सह दाखल होऊन तब्बल एक तास युद्ध पातळीवर काम करत त्याना यश आले आहे व त्या कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चांदोरी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व क का वाघ महाविद्यालयात पाणी शिरल्याने वर्गान मध्ये गाळ साचला आहे व मोठया प्रमाणात वित्त हानी झाली आहे. चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दखल घेऊन औषधसाठा व रु ग्ण व कागद पत्र सुरक्षितस्थळी हलविले आहे. शनिवार सकाळपासुन चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी तसचे सायखेडा पोलीस ठाणे तसेच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
चांदोरीसह सायखेड्याला पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:58 PM