निफाडच्या प्रांत डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम राबवण्यासाठी एक पथक नेमण्यात आले होते. या पथकामध्ये शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, यांचा समावेश होता. गावातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुटुंबातील सर्व सदस्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे, ऑक्सिजनची पातळी तपासणे, खोकला व इतर लक्षणे यांची तपासणी करणे, यातील लक्षणे असणाऱ्यांची नोंद करणे, त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविणे अशी जबाबदारी या पथकाकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतर, संशयित व्यक्तीचे स्वॅब तपासणी करण्यात येत होती. निफाड तालुक्यातील ११९ गावांत एकूण घरांची संख्या ९८,६५० असून, त्यापैकी ९८,१४२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. निफाड तालुक्याची लोकसंख्या ४,९३,२५१ असून, यापैकी ४,८८,५९८ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. एकूण ९९.१ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले.
इन्फो
२,३१९ नागरिक निगेटिव्ह
या पथकाने केलेल्या सर्वेक्षणात ९९.५ फॅरनाइटच्या पुढे ताप आलेले ५०५ जण, तर ९५ पेक्षा ऑक्सिजन पातळी कमी असलेले ३०० जण आढळून आले. ज्यांचा पल्सरेट १०० पेक्षा जास्त होता, असे ३३१ जण तर अंगदुखी, वास, चव न येणारे ४३८ जण आढळून आले. या सर्वेक्षणात सर्दी, ताप आलेले १,१०९ जण निघाले. सर्व सर्वेक्षणात २,९०३ संशयित व्यक्तींचे स्वॅब करण्यात आले. त्यापैकी ५८४ व्यक्ती कोरोनाबाधित निघाले, तर २,३१९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.