नाशिक : बदलीच्या तीन दिवस अगोदर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत मनपाची समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये, खुल्या जागा यासह तब्बल ९०० हून अधिक मिळकतींसंदर्भात राबविलेल्या सर्वेक्षणांतर्गत संकलित केलेल्या माहितीची कागदपत्रे धूळ खात पडून असून सर्वेक्षणाचा अहवाल बाहेर येऊ नये यासाठी राजकीय दबाबतंत्राचा वापर सुरू आहे. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांपासून माहिती संगणकात बंदिस्त करण्यास व वर्गीकरणास विलंब लावला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने आपल्या अनेक मिळकती नाममात्र भाडेतत्त्वावर स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था, मंडळे यांना सामाजिक उपक्रमांसाठी ताब्यात दिलेल्या आहेत. परंतु यातील अनेक मिळकतींचा गैरवापर सुरू असल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात. या मिळकतींबाबत अॅड. बाळासाहेब चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार आमदार सीमा हिरे यांच्या ताब्यातील समाजमंदिराला मनपाने सील ठोकण्याची कारवाईही केली होती. त्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत ७५० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मनपाची समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये, खुल्या जागा यांसह तब्बल ९०० हून अधिक मिळकतींची अचानक धडक सर्वेक्षण मोहीम दि. ५ जुलै रोजी राबविली होती. त्यात प्रामुख्याने एका ठिकाणी समाजमंदिराचा वापर गुदाम म्हणून करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
महापालिका मिळकतींचे सर्वेक्षण बासनात
By admin | Published: August 27, 2016 12:23 AM