नाशिक : शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्याचा विचार असून त्यातून घरपट्टी व पाणीपट्टीचीही पडताळणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर सर्वेक्षणासंबंधी निर्णय घेण्यासाठी येत्या ५ जानेवारीला शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राचार्यांची बैठकही बोलाविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.मनपामार्फत मिळकतींचेही सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहेत. सदर सर्वेक्षण अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्याचा विचार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मानधनही देण्याची तयारी असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या सर्वेक्षणात प्रत्येक घरातील खोलीचे अंतर्गत मोजमाप करण्यात येईल. तसेच बांधकाम कायदेशीर आहे किंवा नाही याचीही चाचपणी केली जाईल. पाणीमीटर नसेल तर त्याठिकाणी मीटर लावण्याची प्रक्रिया राबविली जाईल. शंभर टक्के घरांचा सर्व्हे करणे, त्याची यादी करणे आणि त्यानुसार मीटरिंग करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मिळकतींच्या सर्व्हेदरम्यान, घरपट्टी व पाणीपट्टीचीही माहिती संकलित केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत वॉटर आॅडिटचीही प्रक्रिया सुरू झाली असून सदर काम १८ महिने चालणार आहे. सदर काम एनजेएस या एजन्सीला देण्यात आले आहे. २० टक्के घरांपर्यंत पोहोचून सखोल अहवाल तयार करण्यात येईल. पाणीपुरवठा वितरणातील गळती शोधण्यावर भर राहील. वॉटर आॅडिटच्या माध्यमातून नवीन टाकी कुठल्या भागात उभारण्यात यावी याचे चित्र समोर येईल तसेच संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यास मदत होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मदतीने मिळकतींचा सर्व्हे
By admin | Published: January 02, 2016 11:31 PM