सिडको : पावसाच्या संततधारेने चुंचाळे गावात राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबाच्या घराच्या लोखंडी जिन्यात वीजप्रवाह उतरला. यावेळी वीजप्र्रवाहाचा झटका लागून घरातील काही सदस्य कोसळले. ही बाब घरातील तरुण मारकस बाळू शिरसाठ (३९) यांच्या लक्षात आली. त्यांनी जिवाची पर्वा न करता धाडसाने जिन्याजवळ जाऊन घरातील महिलांसह स्वत:च्या वडिलांना बाजूला करत त्यांना जीवदान दिले. मात्र मारकस यांचा विजेच्या जबर धक्क्याने मृत्यू झाला.याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चुंचाळे शिवारातील रामकृष्णनगरमध्ये राहणारे मारकस शिरसाठ हे सोमवारी सकाळी कुटुंबीयांसोबत घरातच होते. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या लोखंडी पायऱ्यांच्या जिन्यामध्ये पावसामुळे अचानक विद्युतप्रवाह उतरला. यावेळी घरात असलेल्या महिला सदस्य अर्चना शिरसाठ, सुवासिनी शिरसाठ, बाळू शिरसाठ या सर्वांना विजेचा झटका बसल्याने ते सगळे जिन्याजवळ कोसळले. ही बाब मारकस यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. मोठ्या धाडसाने त्यांनी या सगळ्यांना जिन्यापासून लांब केले. मात्र यावेळी त्यांनाही वीजप्रवाहाचा धक्का बसला आणि ते जिन्यावरून खाली कोसळले. दरम्यान, त्यांना अत्यवस्थेत भाऊ मधुकर याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले.४या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. मारकस यांच्या धाडसाने घरातील तिघा सदस्यांचे प्राण वाचले असले तरी त्यांचा मात्र मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुटुंबीयांना वाचविताना लावली जिवाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:27 AM