नांदगाव : रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून दळणवळणासाठी असलेल्या सबवेमधील पाण्याचा उपसा झाला नसल्याने साचलेल्या पाण्यात पादचारी बुडाल्याने पुन्हा एकदा सबवेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने बुडणाऱ्या या व्यक्तीस वेळेवर वाचविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, सबवेमधील साचणाऱ्या पाण्याचा उपसा करणाऱ्या इंजिनसाठी डिझेल मिळू शकले नसल्याने रविवारी (दि. २६) पावसाचे प्रमाण अत्यल्प असूनदेखील सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. त्यातून रेल्वेत कामगार असलेला रवी बागुल या साचलेल्या पाण्यातून बाहेर पडू पाहत असताना त्याचा तोल जाऊन तो बुडू लागला.
हे बघून सबवेच्या आजूबाजूस असणाऱ्यांनी एकच आरडाओरड केली. त्याच सुमाराला एका युवकाने या बुडणाऱ्या बागुलला पाण्यातून बाहेर काढले. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बागुल याला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.