मालेगाव : दगडफेक प्रकरणातील संशयित आरोपी व जनता दलाचे नेते मुस्तकिम डिग्नीटी यांनी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य शासनाच्या दबावामुळे एमआयएम व जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महापालिकेत सत्ताधारी कॉंग्रेसने आमच्यावर गुन्हे दाखल असल्याची संधी साधून लाखो रुपयांचे ठेके व ठेकेदारांची बिले अदा केली आहेत. माजी आमदार रशीद शेख व आसीफ शेख यांच्यावरही त्यांनी कडक शब्दात टीका केली.
पत्रकार परिषदेत मुस्तकिम डिग्नीटी म्हणाले की, दगडफेक प्रकरणात माझा कुठलाही संबंध नाही. दिवंगत नेते निहाल अहमद यांचा शहरात दबदबा होता. आत्ताच्या लोकप्रतिनिधींचा वचक राहिला नाही. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला आम्ही मानतो. हिंसेचे समर्थन करणार नाही. राज्य शासनाच्या दबावामुळे एमआयएम व जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात आले. सत्ताधारी पक्षाच्या लोकांवर गुन्हे दाखल नाहीत. माजी आमदार आसीफ शेख व रशीद शेख यांनी पक्षाला वाचविण्यासाठी आयोजक व जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप केले. माजी आमदार आसीफ शेख यांनी दगडफेकप्रकरणी पुरावे असल्याचे जाहीर केले आहे. मग गेले महिनाभरापासून शेख यांनी पोलिसांना पुरावे का सादर केले नाही. पुरावे लपविणे हा गुन्हा आहे. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डिग्नीटी यांनी केली. शहरातील नागरिकांना अडकविण्यात आले. गेल्या महिनाभरात महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत मोठमोठ्या ठेक्यांना मंजुरी दिली गेली. प्रलंबित ठेेकेदारांची बिले अदा केली गेली. ठेकेदार लॉबी जोरात आहे. शहराला दुर्दैवी घटनेत अडकवून शेख कुटुंबीय केवळ मालमत्ता कमवित आहेत. शहराचे नुकसान केले जात आहे. वेगवेगळे विधाने करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जनता दलाच्या शान -ए-हिंद यांनी पक्षाचे कामकाज या काळात सुरळीत चालू ठेवले. आम्ही कुठल्याही प्रकारचा दरोडा, चोरी केली नाही. बंद आंदोलनात सहभाग घेणे हे चुकीचे नाही. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नसल्याने मंगळवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली असल्याचेही डिग्नीटी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.