नाशिक : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची मेलेली माती पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असून, स्त्रियांनी शिक्षण आणि स्वसंरक्षणासोबतच सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.नाशिक द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे नांदूर नाका परिसरातील शेवंता लॉन्स येथे राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे यांच्यासह व्यासपीठावर आॅर्गेनिक सोसायटीचे चेअरमन कांजीभाई कलावाडीया, एन. डी. पाटील, अश्विनी न्याहारकर, सुप्रिया सोनवणे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, पूर्वीपासून शेतीची धुरा महिलांनी सांभाळली आहे. मात्र शेतात बैलांची जागा जरी ट्रॅक्टरने घेतली असली तरी शेतकरी महिला बदललेली नाही. या महिलांनी शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी समाजात स्त्री शिक्षणाचा प्रचार व प्रसार आणखी व्यापक पद्धतीने होणे गरजेचे आहे. पारंपरिक शेती करण्यासाठी आजची नवीन पिढी तयार होत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून शेती आणि मातीच्या विकासासाठी सेंद्रिय शेतीच्या दिशेने जाणे काळाची गरज बनली असून, स्त्री शिक्षणामुळे हे आव्हान पेलने शक्य होईल. महिलांनी ज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली असून, ज्या महिलांनी शिक्षणाच्या आधारे शेतीत प्रवेश केला त्यांनी शेतीचे रूप पालटले असून, अशा महिलांचा यशोचित सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळून शेतीतील मेलेल्या मातीला पुनरुज्जीवन मिळेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. वसंत ढिकले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. चंद्रकांत बनकर यांनी आभार मानले.
सेंद्रिय शेतीचे तंत्र आत्मसात करावे सूर्यकांता पाटील : राज्यस्तरीय द्राक्ष उत्पादक महिला गौरव पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:50 PM