नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने शताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा केलेला संकल्प बुधवारी (दि. २४) पूर्ण केला. यात संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सुमारे दीड कोटी सूर्यनमस्कार घालून संकल्पपूर्तीबरोबरच विश्वविक्रम केला. वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया व वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड या संस्थांचे दोन नवे विश्वविक्रम करून संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकावले आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्रमांतर्गत बुधवारी रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पंचवटी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर मान्यवरांच्या उपस्थितीत हा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, इंदूर येथील परमानंद युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉ. ओमानंद गुरु जी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, नागनाथ गोरवाडकर, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुई. वायुनंदन, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी उपक्रमप्रमुख अलका कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते मारुतीचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराचे प्रात्याक्षिके केली. यावेळी डॉ. ओमानंद गुरु जी यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगताना, सूर्यनमस्काराने शक्ती, बुद्धी व उंची वाढते. तसेच आयुष्य यशस्वी होते असे नमूद केले, तर गिरीश महाजन यांनी संस्थेने एक वर्षात एक कोटी सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याच्या संकल्पाची पूर्ती करून केलेल्या विश्वविक्रमाचे कौतुक केले. आयुष्य उज्ज्वल राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित सूर्यनमस्कार केले पाहिजेत, यातून सुदृढ देश घडणार आहे, असेही ते म्हणाले. विजय काकतकर यांनी संस्थेच्या विविध शाळांनी वर्षभरात एक कोटी पंचेचाळीस लाख सामूहिक सूर्यनमस्कार घालून दोन विश्वविक्र म केल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्राची सराफ यांनी सूत्रसंचालन केले. प्रद्युम्न जोशी यांनी आभार मानले.दोन विश्वविक्र मांची नोंदसंस्थेने वर्षभरात एक कोटी पंचेचाळीस लाख सूर्यनमस्कार घातले. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी, महाराष्ट्राचे प्रमुख दिनेश पैठणकर व वण्डर बुक आॅफ रेकॉर्डच्या अधिकारी डॉ. सुवर्णा व श्री नरेंद्र बिंगी यांनी घेतली.संस्थेने सूर्यनमस्कारमध्ये विश्वविक्रम केल्याने या दोन्ही संस्थांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. काकतकर आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविले.पालकमंत्र्यांचेही सूर्यनमस्कारया सोहळ्यास उपस्थित पालकमंत्री गिरीश महाजन तसेच मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांच्यासह संस्थाचालकांनी सूर्यनमस्कार घालून सहभाग घेतला. सूर्यनमस्काराच्या या विश्वविक्रमी कार्यक्र मास आॅस्ट्रेलिया, इटली, जपान, दक्षिण आफ्रिका यासह अकरा देशांचे तेरा प्रतिनिधी उपस्थित होते.
सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:57 AM