नाशिक : मनपाच्या करसवलत योजनेला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ८० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून गतवर्षीच्या तुलनेत वीस कोटी वसुली सरप्लस आहे. दरम्यान, मे अखेरपर्यंत शंभर कोटींचा टप्पा गाठण्याचे कर संकलन विभागाचे उद्दिष्ट आहे. महापालिकेच्या उत्पन्नात सर्वांत मोठा वाटा हा मालमत्ता कराचा असतो. मागील आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने तब्बल दोनशे कोटी मालमत्ता कर वसूल केला.
यंदा आयुक्तांनी त्यात वाढ करत २२५ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. महापालिका नियमित करदात्यांसाठी नवीन आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तीन महिन्यात विशेष सवलत योजना राबवते. एप्रिल महिन्यात बिल अदा केल्यास एकूण रकमेच्या आठ टक्के सूट देते. ऑनलाइन रक्कम भरल्यास दहा टक्के सूट दिली जाते. तर मे महिन्यात सहा टक्के तर जून महिन्यात तीन टक्के सूट मिळते. एप्रिल महिन्यात जवळपास पन्नास कोटी वसुली मनपाच्या तिजोरीत जमा झाली. तर चालू मे महिना धरून हा आकडा ८० कोटींच्या पुढे पोहोचला आहे.
गतवर्षी आजमितीला वसुलीचा आकडा ५९ कोटी इतका होता. मे महिना अखेरपर्यंत वसुलीचा आकडा शंभर कोटींच्या पुढे जाईल, अशी कर संकलन विभागाला अपेक्षा आहे. सर्वाधिक वसुली नाशिक पश्चिम विभागात झाली असून त्या खालोखाल नवीन नाशिक विभागात झाली आहे. जून अखेरपर्यंत नागरिकांना सवलत योजनेचा लाभ घेता येईल.
विभागनिहाय वसुलीसातपूर - ९ कोटी ६६ लाखनाशिक पश्चिम- १६ कोटी ९८ लाखनाशिक पूर्व - १२ कोटी ५९ लाखपंचवटी - १४ कोटी ३२ लाखसिडको - १५ कोटी ९० लाखनाशिकरोड - १० कोटी ८८ लाख
कर सवलत योजनेला उदंड प्रतिसाद लाभला असून एप्रिल व चालू मे महिना धरून ८० कोटींच्या पुढे मालमत्ता कर वसुली झाली असून या महिन्याच्या अखेरपर्यंत शंभर कोटींचा टप्पा पार होईल. नागरिकांनी सवलत योजनेचा लाभ घेत मनपास सहकार्य करावे.- विवेक भदाणे, उपायुक्त (प्र), कर संकलन विभाग मनपा