दि. २७ जुलै रोजी सायंकाळी रमजानपुरा भागातील आमिन मौलाना चौकातील जाविद मिलन हाॅटेलसमोर गुटखा विक्री व इतर सामानाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पान दुकानदार शेख अबरार शेख सलीमचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला होता. याप्रकरणी मयताचा भाऊ शेख हसन शेख सलीम याने फिर्याद दिली होती. फिर्यादीवरून जमाल अंजुम मोहम्मद अय्युब, बिलाल अहमद मोहम्मद अय्युब व मोहम्मद अय्युब या तिघांविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांपैकी बिलाल अहमद यास अवघ्या आठ तासात अटक करण्यात आली होती, तर मोहम्मद अय्युब याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. मुख्य संशयित जमाल अंजुम मात्र फरार होता तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. रमजानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक रोही, पोलीस नाईक सोमनाथ ह्याळीज व पोलीस शिपाई पाटील यांच्या पथकामार्फत औरंगाबादमध्ये दडून बसलेल्या जमाल अंजुमला बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.
पान दुकानचालकाच्या हत्येप्रकरणी संशयितास औरंगाबादहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:19 AM