नाशिक : गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती सरकारवाडा गुन्हे शोध पथकाला मिळाली. या पथकाने नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात सापळा रचून एका २२ वर्षीय तरुणास संशयावरून ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता दोन गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे त्याच्याकडे आढळून आली. पोलिसांनी त्यास अटक करून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेश राजेंद्र जाधव (२२, रा. शिवाजीनगर) हा युवक ठक्कर बाजार परिसरात गावठी कट्टे घेऊन येणार असल्याची खात्रीलायक खबर होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांना कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. उपनिरीक्षक टी. एम. राठोड, हवालदार मुकेश राजपूत, सुरेश शेळके आदींच्या पथकाने सापळा रचला. गणेश या ठिकाणी आला असता त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांचा संशय बळावला. पथकाने त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत झटापट करून निसटण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो असफल ठरला. पोलिसांनी तत्काळ त्यास बेड्या ठोकून वाहनात डांबले.पोलिसांनी त्यास ताब्यात घेत अंगझडती घेतली असता २ गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे आढळून आली. या प्रकरणी गणेश विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणत शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत
गावठी कट्ट्यांसह संशयितास अटक; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:36 AM