दरम्यान, काल (दि.२८) अशोक मेंगाळ यास सिन्नर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास गुरुवारपर्यंत (दि.२) पोलीस कोठडी सुनावली. संशयित अशोक मेंगाळ याने चारित्र्याच्या संशयातून दि.१९ रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास शिवडे येथील जनता विद्यालयासमोर ४० ते ५० मजूर जमलेले असताना या गर्दीत अचानक शिरून रावसाहेब कातोरे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. अशोकने झाडलेली गोळी रावसाहेब कातोरे यांच्या उजव्या हाताला चाटून जात त्यांच्या पाठीमागे उभी असलेली पत्नी मनीषा रावसाहेब कातोरे यांच्या थेट पोटात घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. काही मजुरांनी प्रसंगावधान राखत अशोक मेंगाळचा पाठलाग करून त्यास पकडत गावठी कट्टा हिसकावून घेत त्याला झाडाखाली बसविले. आपण पळून जाणार नाही जागेवरच थांबू असे म्हणत पाच - दहा मिनिटांत बघ्यांची नजर चुकवत त्याने धोंडबार औंढेवाडी शिवारातील डोंगराकडे धूम ठोकत ठोकली होती.
याप्रकरणी सिन्नर पोलिसांत अशोक मेंगाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकांकडून त्याचा शोध सुरू असताना रविवारी अशोक मेंगाळ हा डुबेरेवाडी परिसरात असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच हवालदार गोसावी, पिठे यांच्यासह पोलीस पथकाना डुबेरेवाडी परिसरात सापळा रचून सायंकाळी ६.३० च्या सुमारास अशोक मेंगाळ यास ताब्यात घेत सिन्नर पोलीस ठाण्यात आणले. रात्री नऊ वाजता त्यास अटक करण्यात आली. मेंगाळ यास सिन्नर न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी करीत आहेत.