एम.डी. स्त्रीरोग विद्याशाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉ. स्वप्निल शिंदे हे मंगळवारी ( १७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्रसाधनगृहात कोसळून बेशुद्ध झाल्याने त्यांना मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी विविध बाजुंनी शक्यता पडताळून बघितल्या जात असून, कसोशीने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख यांनी सांगितले. रात्री उशिरा नातेवाइकांनी स्वप्निल यांचा मृतदेह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताब्यात घेतला.
मृत स्वप्निलच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. स्वप्निल ताण-तणावाविरुध्द संघर्ष करत होता. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. त्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी यापूर्वी कधीही रॅगिंगबाबतची कोणतीही तक्रार केलेली नाही, असे अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी सांगितले. व्हिसेरा अहवाल प्राप्तीनंतर मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.