नाशिक : अनैतिक संबंधातील वादातून प्रेयसीसह तिची मुलगी व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलेला प्रियकर संशयित जलालुद्दीन खान हा रेल्वेतून उडी मारून फरार झाला आहे़ तर रेल्वेतून उडी मारून पळालेल्या खानला पकडण्यासाठी रेल्वेतून उडी मारलेले पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे हेदेखील जखमी झाले आहेत़
गेल्या सोमवारी (दि.६) दिंडोरीरोडवरील मायको दवाखान्या पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथे संशयित जलालुद्दीन खान याने अनैतिक संबंधातील वादातून प्रेयसी संगीता देवरे तिची मुलगी प्रीती शेंडगे व नात सिद्धी शेंडगे वय (९ महिने) या तिघींवर रॉकेल ओतून पेटवून दिले़ यामध्ये नऊ महिन्यांच्या सिद्धीचा जागीच मृत्यु तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेली प्रेयसी संगीता देवरे हिचा मंगळवारी (दि़७) तर तिची मुलगी प्रिती श्ोंडगे हिचा बुधवारी (दि़८) मृत्यू झाला़ या प्रकरणी संश्यिता खान विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
संशयित जलालुद्दीन खान याच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. ६) सायंकाळी सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे आणि एका पोलिस कर्मचाऱ्यास थेट विमानाने दिल्लीला पाठविले होते. या दोघांनी मथुरा गाठून संशयित आरोपी जलालुद्दीन खान याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी (दि. ७) मथुरा येथून झेलम एक्स्प्रेसने मनमाडला येण्यासाठी निघाले होते. झेलम एक्स्प्रेसने उत्तर प्रदेश सोडून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला होता.रात्री पावणे नऊ ते नऊ वाजेच्या सुमारास गंजबासोदा ते विदिशा या रेल्वेस्थानकादरम्यान अंधाराच्या ठिकाणी रेल्वेचा वेग कमी झाल्याचा तसेच अंधाराचा फायदा घेत जलालोद्दीन खान याने रेल्वेतून उडी मारली व फरार झाला़
संशयित जलालुद्दीनला पकडण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे यांनी देखील चालत्या रेल्वेतून उडी मारल्याने ते जखमी झाले आहेत़ दरम्यान निरीक्षक कड यांनी नाशिकहून पुन्हा एक पथक त्यांच्या मदतीला तसेच आरोपीच्या शोधासाठी पाठविले आहे.