नाशिक : जिल्ह्यातील स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दहा रुग्ण असून, त्यामध्ये तीन पुरुष व सात महिलांचा समावेश आहे़ तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये किशोर सुधारालयातील सतरा वर्षीय विधीसंघर्षित बालक व सातपूर श्रमिकनगरमधील महिलेचा समावेश आहे़ दरम्यान, गत आठवड्यात मृत्यू झालेल्या मोखाडा येथील महिलेचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे़ स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील पन्नासहून अधिक नागरिकांचा आतापर्यंत बळी घेतला आहे़ मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत या रोगांचा फैलाव रोखण्यात यश आले, मात्र जूननंतर पुन्हा या रोगाचा फैलाव होऊन रुग्णसंख्या वाढत आहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांमध्ये सातपूर परिसरातील तीन, इगतपुरी तालुक्यातील तीन, जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील एक, शहरातील वडाळा नाका व म्हसरूळ व शिवाजीनगर (सातपूर) परिसरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़दरम्यान, यापैकी दोन पॉझिटीव्ह, पाच निगेटीव्ह तर दोन जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मोखाडा येथील एका मयत रुग्णाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.
जिल्हा रुग्णालयात दहा स्वाइन फ्लू संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:06 AM