इगतपुरी : रेल्वे प्रवासात चाकूचा धाक दाखवून प्रवाशांची लूट करणाऱ्या एका संशयितास इगतपुरी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आधीही याच घटनेत नाशिकरोड परिसरातील २ संशयित युवकांना पोलिसांनी अटक केली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश शंकर जाधव (२६) कन्नमवार नगर- २, विक्रोळी ईस्ट, मुंबई हे सोमवारी (दि. २३) दुपारी नागपूर-मुंबई विशेष गाडीच्या पाठीमागील जनरल बोगीतून धामणगाव ते मुंबई असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना इगतपुरी रेल्वे स्टेशन येण्याच्या आधी जाग आली असता, आरोपी रहीम अन्सार शेख (२४, रा. गुरुकृपा लॉन्सजवळ, मथुरा रोड, विहीतगाव, नाशिक), विक्रम क्रिष्णा अहिरे (२५, रा. जेतवन नगर, जय भवानी रोड, नाशिक), राहुल सुरेश सोमवंशी (२३, रा. देवळालीगाव, सुंदर नगर, नाशिक) यांनी संगनमत करून त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांच्या शर्टाच्या खिशातून रोख १ हजार रुपये हात घालून जबरीने हिसकावून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. भाले, हवालदार रमेश भालेराव, विलास जाधव, योगेश पाटील, प्रमोद आहके यांनी तातडीने काही तासातच आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला. या आरोपींना पकडून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, पाचशे रुपये रोख जप्त करण्यात आले. संशयित आरोपींना बुधवार (दि. २५) मनमाड रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे करीत आहेत.