नाशिक : महापालिकेच्या सातपूर येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेला वाहनचालक रवींद्र अंकुश भोळे यास डिझेल घोटाळाप्रकरणी आयुक्तांनी निलंबित केले आहे. मागील स्थायी समितीच्या सभेत दिनकर पाटील यांनी अग्निशमन केंद्रातील या डिझेल घोटाळ्यावर प्रकाश टाकला होता. त्याबाबत प्रशासनाने चौकशी केली असता वाहनचालक रवींद्र अंकुश भोळे याने कामावर असताना आणि नसतानाही परस्पर वर्कशॉपमधून वाहनामध्ये डिझेल भरण्यासाठी पावत्या घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार भोळे याच्याविरुद्ध शिस्तभंग विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून त्यास तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. रकमेच्या अपहारप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेश आयुक्त डॉ. गेडाम यांनी काढले आहेत. हा घोटाळा म्हणजे हिमनगाचे टोक असून वरपासून खालपर्यंत मोठा गैरव्यवहार असल्याचा आणि त्याची चौकशी करण्याची मागणी दिनकर पाटील यांनी केली आहे.
डिझेल घोटाळाप्रकरणी वाहनचालक निलंबित
By admin | Published: May 13, 2016 10:58 PM