लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथील प्राथमिक शाळेत पुरविण्यात आलेल्या पोषण आहारासाठी प्राप्त माल व शिल्लक माल यात तफावत आढळल्याने शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी डी. डी. देवरे यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनधिकृत गैरहजर असलेल्या दोघा कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतनकपात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी दिंडोरी व कळवण तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली असता त्यात उपरोक्त बाबी निदर्शनास आल्या. ओझे ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी केल्यानंतर प्राथमिक शाळेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पोषण आहारांतर्गत पुरविण्यात आलेल्या तांदळाची तपासणी केली असता पुरवठाधारकाने २०० किलो तांदूळ पुरविल्याची नोंद असताना प्रत्यक्षात १९२ किलोच तांदूळ आढळून आला. या प्रकरणी संबंधित विस्तार अधिकारी डी. डी. देवरे यांना निलंबित करण्याचे तसेच विस्तार अधिकारी देवरे यांच्याकडे जबाबदारी असलेल्या गटातील सर्व शाळांमधील पोषण आहाराच्या तपासणीचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता हिवताप कर्मचारी एम. जी. पवार हे हालचाल नोंदवहीवर वणी येथे कार्यक्षेत्र भेटीसाठी गेल्याची नोंद केली, मात्र त्यांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता ते न्यायालयीन कामासाठी नाशिक येथे असल्याचे आढळून आले. तसेच परिचर यू. के. निकम हे गेल्या ३ दिवसांपासून अनधिकृत गैरहजर असल्याचे आढळून आले. या दोघी कर्मचाºयांना नोटिसा देऊन त्यांची रजा विनावेतन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.