येवला : भारतीय मजदूर संघाचे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येवले नगरपालिका कार्यालयासमोर मागण्यांबाबत धरणे आंदोलन सुरू होते मात्र नगराध्यक्षांसमवेत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून न.पा. कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते. या मागण्यांची तड लावायचीच या निश्चयाने संघटनेने तीन टप्प्यात तीव्र आंदोलनाची तयारी केली होती. त्यानुसार आज रोजी सर्व कर्मचाऱ्यांनी येवले न.पा. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत घोषणाबाजी केली. त्यानंतर संघटना पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्ष नीलेश पटेल यांनी त्यांचे दालनात पाचारण केले. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्यासह नगरसेवक मनोहर जावळे, मुश्ताक शेख, न.पा. प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. तेथील चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.या मान्य झालेल्या मागण्यांचे दि. १६ जूनपावेतो आदेश पारित करण्याचे चर्चेदरम्यान ठरले. त्याप्रमाणे न.पा. प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास ठरल्याप्रमाणे आंदोलन होईल, असे सांगण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय देत ६ वर्षांनंतर ६ वा वेतन आयोग लागू झाला. संघटनेचा दीर्घ लढा यशस्वी झाला. तसेच याकामी सकारात्मक दृष्टिकोनातून या मागणीस न्याय देणारे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगराध्यक्ष नीलेश पटेल यांचे सन्मानार्थ फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याने कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करीत नगराध्यक्ष पटेल व मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांनी शहर विकासासह वयोवृद्ध कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांचे संघटनेने आभार व्यक्त केले.