नाशिक : एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या एसटी महामंडळाच्या तीन कर्मचाºयांना निलंबनाची नोटीस दिली असल्याची माहिती हाती आली आहे. शुक्रवार (दि. ८) ते शनिवार (दि. ९) सायंकाळपर्यंत हा संप चालला होता. शुक्रवारी (दि. ८) संपात नाशिक आगारातून सहभागी झालेल्या पाच जणांच्या निलंबनाच्या नोटिसा आगारातील नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या होत्या. मात्र सायंकाळी परिवहनमंत्र्यांच्या आदेशानंतर या नोटिसा फाडून टाकण्यात आल्या होत्या व कारवाई मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या चौघांबरोबरच शहरातील २६ व जिल्ह्यातील २०० जणांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते, तेही मागे घेण्यात आले. शनिवारी सायंकाळी संप मिटल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यात सर्वत्र बससेवा सुरळीत सुरू झाली. याअंतर्गत प्रमोद भालेकर, विजय पवार, संघटना पदाधिकारी गवळी यांच्या निलंबनाची नोटीस लावण्यात आली असून, परिवहनमंत्र्यांच्या आदेशानंतरही का कारवाई केली जात आहे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. संघटनेचे पदाधिकारी मुंबईच्या परिवहन मंत्रालयात याबाबत संपर्क साधत असून, संपर्क झाल्यावरच त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे समजते. निलंबनाची नोटीस संबंधित व्यक्तीला वैयक्तिकरीत्या देणे आवश्यक असताना ती अशाप्रकारे नोटीस बोर्डवर का लावण्यात आली आहे, जाणूनबुजून अशा गोष्टी तर केल्या जात नाही ना, अशीही चर्चा कर्मचाºयांमध्ये होत आहे.
संपात सहभागी एसटीचे तीन कर्मचारी निलंबित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:39 AM