नाशिक : पिंपळगाव केंद्रावर नेमणूक असलेला महामार्ग पोलीस दलातील पोलीस अभिनव अरुण नाईक यांच्यावर ठाणे परिक्षेत्रांतर्गत महामार्ग पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालावधीत नाईक यांची नाशिक ग्रामीण मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे अशोभनीय कृत्य के ल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि.१४) अभिनव अरुण नाईक यांनी मध्यरात्री नेक्सा कारमध्ये तीन मित्रांसह मद्यधुंद अवस्थेत प्रवास करत सुसाटपणे कार (एमएच १४, जीवाय ८०१८) चालवून नाकाबंदीवरील पोलिसांच्या अंगावर कार टाकण्याच्या प्रयत्न करत बॅरिकेडला धडक देत पळ काढल्याची घटना नाशिकरोड-जेलरोड या भागात घडली होती. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून नाईक यांनी भरधाव कार चालवत नाकाबंदीवरील पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तसेच त्या पोलीस ठाण्याची हद्द सोडल्यानंतर जेलरोड येथील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करताच तेथेही नाकाबंदीवरील पोलिसांकडे दुर्लक्ष करत त्यांना मोटारीने धडक देण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नाईक यांच्या कारचा पोलिसांनी पाठलाग करून बॅरिकेड लावून घेरले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हवालदार अल्लाउद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महामार्ग पोलीस दलातील कर्मचारी नाईक यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३६, १८८ प्रमाणे तसेच मोटार वाहन कायद्यान्वये नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नाईक यांच्या या बेजबाबदार व बेकायदेशीर कृत्याची गंभीर दखल घेत त्यांना बुधवारी (दि.१५) निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या कालावधीत त्यांना नाशिक ग्रामीण मुख्यालयात नेमण्यात आले आहे.