नाशिक- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी बेमुदत बंदची हाक देताच शिक्षण खाते काहीसे नरमले असून, वादग्रस्त आकृतीबंधाला स्थगिती देण्याची तयारी केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोलविलेल्या बैठकीत तसे आश्वासन दिले आहे. तथापि, संघटनांना यासंदर्भात लिखित आश्वासन हवे आहे. २३ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या सुधारित आकृतीबंध अध्यादेशामुळे सध्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले असून, त्यांच्या सेवेवर गंडांतर आले आहे. त्यासंदर्भात संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. गेल्या १३ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यास शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संघटनांची बैठक घेतली. यावेळी अध्यादेशास स्थगिती देण्याचे तसेच त्यासंदर्भात एक समिती नेमून सर्वांना स्वीकारार्ह तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु लेखी आश्वासन मात्र दिलेले नाही. अशाच प्रकारे २०१३-१४ यापट पडताळणीच्या आधारे सुरू असलेली कार्यवाही रद्द करावी, शिक्षण हक्क कायद्यातील त्रूटी दूर करावी अशा मागण्या त्यांनी मान्य केले. पूर्णवेळ ग्रंथपालांना अर्धवेळ केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस आमदार रामनाथ मोते तसेच अन्य शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षण खात्याच्या आकृतीबंधास स्थगिती?
By admin | Published: January 20, 2015 1:04 AM