नाशिकरोड : रेल्वे तिकिटांचा काळा बाजार वाढल्याच्या अनेक तक्रारी आल्याने मुंबई रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कता विभागाच्या पथकाने सापळा रचून एका ट्रॅव्हलच्या एजंटाकडून ८४ हजाराची आरक्षित तिकिटे जप्त करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या आरक्षित व वातानुकूलित वर्गाच्या तिकिटांचा काळा बाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा दलाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कता विभागाचे निरीक्षक अतुल क्षीरसागर, भुसावळ रेल्वे गुन्हे अन्वेषण विभागाचे फरीयाद खान, महेमुद शेख, अंबिका यादव, गौरव वर्मा, महेश महाले यांनी मंगळवारी सकाळी शरणपूररोड तिबेटियन मार्केट येथे सापळा रचला होता. यावेळी पंचवटीतील लक्ष्मीवैभव टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा एजंट मनोज अशोक बैरागी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८४ हजार रुपये किमतीची २६ आरक्षित आणि ई-तिकिटे जप्त करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरणपूर रोड तिबेटियन मार्केट व नाशिकरोड रेल्वे स्थानक येथील आरक्षण केंद्रात एजंटांचा सुळसुळाट झाल्याने तिकिटांचा काळा बाजार वाढला आहे. एजंटांना काही रेल्वे कर्मचारी मदत करत असल्याचे बोलले जाते. तसेच याकडे रेल्वे पोलिसांचादेखील काणाडोळा होत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचा संशय
By admin | Published: September 08, 2016 1:45 AM