नाशिक : आर्थिक घोटाळे व गैरव्यवहाराच्या संशयावरुन अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) पथके शहरात दोन दिवसांपासून तळ ठोकून होती. या पथकांकडून काही सहकारी पतसंस्थांसह खासगी व्यक्तींची चौकशी करण्यात आल्याचे समजते. यामध्ये शहरातील दोन व जिल्ह्यातील दोन संस्थांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. बहुचर्चित सुमारे तीनशे कोटींच्या केबीसीच्या आर्थिक घोटाळ्याबाबतही पोलिसांकडून माहिती मागविल्याचे समजते.आर्थिक गुन्हेगारी फोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या राजस्व विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. या विभागाकडून विविध मंत्र्यांची व राजकीय व्यक्तींची यापुर्वी करण्यात आलेल्या चौकशी चांगलीच गाजली आहे. दरम्यान, या विभागाची काही पथके नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपुर्वीच दाखल झाली होती असे बोलले जात आहे. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्याची गुरुवारी (दि.२६) दिवसभर शहरात चर्चा होती. सोशलमिडियावरुनही याबाबत विविध पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.
दरम्यान, चौकशीबाबत अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आली नाही. सिन्नर तालुक्यातील एका खासगी सहकारी संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी व शहरातील एका खासगी संस्थेच्या आर्थिक गैर कारभाराची चाचपणी या पथकांकडून करण्यात आल्याचे समजते. हे पथक मंगळवारपासून शहरासह जिल्ह्यात दाखल झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, ह्यईडीह्णच्या पथकांचा नाशकात मुक्काम असल्याच्या बातमीला पोलीस सुत्रांनीही दुजोरा दिला आहे. खाद्य महामंडळाकडूनदेखील या पथकांनी माहिती मागविली आहे. दरम्यान, कारवाईबाबतची अधिक सविस्तर माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकलेली नाही.
ईडी ही एक देशातील आर्थिक गुप्तचर संस्था असून हवाला, मनी लॉन्ड्रींग, भ्रष्टाचार, मोठ्या आर्थिक घोटाळ्यांंवर ईडीचा ह्यवॉचह्ण असतो. त्यानुसार एका पतसंस्थेच्या संचालकाकडून मनी लॉन्ड्रींग झाल्याचाही संशय व्यक्त होत आहे.