नाशिक : जनजाती कल्याण आश्रमाचे हजारो कार्यकर्ते अविरतपणे समाजाची सेवा करत असून, त्यांनी महिला सबलीकरण आणि आरोग्य क्षेत्रात खूप मोठे काम उभे केले आहे. अशाच पद्धतीने संघटित प्रयत्न कायम ठेवल्यास सर्व समाजाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. जनजाती कल्याण आश्रमाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय कल्याण आश्रमचे उपाध्यक्ष सत्येंद्रसिंह यांच्या हस्ते डॉ. पवार यांचा सत्कार करण्यात आला.
भोसला सैनिकी स्कूलमधील डॉ. बा. शि. मुंजे सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी डॉ. पवार यांनी हा माझ्या घरातीलच सत्कार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना डॉ. पवार यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व अध्यक्ष कै. जगदेवराम ऊराव यांच्यासारखे समर्पित कार्यकर्ते संघटनेला लाभल्याने कार्याचा खऱ्या अर्थाने प्रसार झाल्याचे सांगितले. ऊराव यांच्या शृंखलेतील अनेक कार्यकर्ते आजही तेवढ्याच हिरिरीने सक्रिय आहेत. किंबहुना अशा स्वरुपातील कार्यकर्ते सातत्याने घडत पुढे येणे हीच खऱ्या अर्थाने कल्याण आश्रमाची ताकद असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. भविष्यातदेखील शासकीय यंत्रणेशी सांगड घालून आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यास मोठे आणि प्रभावी कार्य उभे करता येईल, असा विश्वास असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. यावेळी सत्येंद्रसिंह यांनी शहरी क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी ग्रामीण, दुर्गम क्षेत्रातील जीवनाचे वास्तव जवळून अनुभवण्याची गरज असल्याचे सांगितले. गावातील, पाड्यांवरील चालीरिती, परंपरा जाणून घेत आपल्याच जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या समाजजीवनाबाबत चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, जनजाती कल्याण आश्रमचे राज्याध्यक्ष डॉ. भरत केळकर, प्रांत सचिव शरद शेळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. पवार यांचे पारंपरिक आदिवासी तालवाद्यांच्या गजरात प्रवेशव्दारापासून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुंडलिक राऊत, शहराध्यक्ष सुजित जाजू, जिल्हा सचिव हेमंत देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
ऊराव यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन
या सोहळ्याप्रसंगी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे पूर्व अध्यक्ष कै. जगदेवरामजी ऊराव यांच्या त्यागमय जीवनावरील चित्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी देशभरातील प्रत्येक जनजातीच्या प्रमुखापर्यंत पोहोचून कार्य सर्वदूर पोहोचविल्याबद्दल उपस्थितांनी त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली.
फोटो (०८ पीएचएसपी ९८)
पारंपरिक आदिवासी तालवाद्यांच्या गजरात डॉ. भारती पवार यांचे प्रवेशव्दारापासून जल्लोषात स्वागत करण्यात आले. (छाया : राजू ठाकरे )