नाशिक : मविप्र संस्थेच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात नाशिकमधील पहिली खासगी कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू झाली असून, मंगळवारी (दि.२८) या लॅबमधून पहिला टेस्टिंग अहवालदेखील प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिकमध्येच स्वॅब तपासणी होणार असल्याने उपचारालादेखील गती प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांवर लवकर उपचार करण्यासाठी नाशिकमध्ये लॅब तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कोरोनावरील उपचाराला गती प्राप्त व्हावी यासाठी केंद्र सरकारने पुणे आणि नागपूर येथील आयसीएमआर या संस्थांना परवानगी दिली होती. त्यानुसार पुण्याच्या आयसीएमआर संस्थेकडून वैद्यकीय महाविद्यालयातील लॅबची चाचपणीदेखील केली होती. अखेर सर्व तांत्रिक बाजू आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची पूर्तता करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू झाले आहे. यापूर्वी पुणे आणि धुळे येथे अहवाल पाठवावे लागत होते.मविप्र संस्थेच्या डॉ. स्व. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वॅब टेस्टिंग लॅबचे कामकाज सुरू झाले आहे. या लॅबची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार , शिक्षणाधिकारी एन. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, डॉ. दादासाहेब दातार, स्नेहा दातार, डॉ. प्रशांत गांगुर्डे उपस्थित होते.लॅब तयार करण्यासाठी मविप्र व दातार लॅब यांच्याकडील साधने व तंत्रज्ञान यांचे एकत्रिकरण करून एक सुसज्ज अशी लॅब तयार करण्यात आली आहे.पुण्याला स्वॅब रिपोर्ट पाठविण्याची जी आरोग्य यंत्रणेची धावपळ होत असे ती या लॅबमुळे थांबणार आहे. रिपोर्ट तातडीने आल्याने क्वॉरंटाइन व्यवस्थापनेचे कामसुद्धा सोपे होणार आहे. लॅब सुरू करण्याचे यश प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या पाठपुराव्यामुळे आले असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.---------या लॅबच्या माध्यमातून दिवसाला १८० नमुने तपासणी होणार असून, दुसरे यंत्रही लवकरच कार्यरत झाल्यावर त्याची क्षमता ३६० पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे अधिक रु ग्णांची तपासणी होणार असल्याने या लॅबचा फायदा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला होणार आहे.- छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री-------------या लॅबच्या माध्यमातून सेवेची एक संधी मिळाली. संकटकाळात निर्माण झालेल्या या लॅबसाठी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. जिल्हा प्रशासनानेदेखील लॅब निर्मितीसाठी सहकार्य केले. आगामी काळात या लॅबचा वापर अधिक होणार असून, लॅब आणखी अद्ययावत करण्याचा प्रयत्न आहे.- नीलिमा पवार,सरचिटणीस, मविप्र
स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:29 PM