नाशिक : संभाजी राजे यांच्या वाट्याला विचित्र आयुष्य आले आणि त्यातून ते कणखर तसेच समृद्ध होत गेले. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्यात स्वाभिमान दिसत होता; त्यातूनच त्यांनी सोसलेले आयुष्य क्रांतिकारी घडले, असे प्रतिपादन क्रांतीशाहीर प्राध्यापक सचिन कानिटकर यांनी केले.संस्कृती नाशिकच्या वतीने कालिदास कलामंदिर येथे आयोजित ‘धगधगते शंभूपर्व’ या तीनदिवसीय व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, गुरुमित बग्गा, अजय बोरस्ते, गजानन शेलार, कैलास कमोद, सतीश शुक्ल, मनोज पिंगळे, डी. जी. सूर्यवंशी, जगदीश मोरे्-देशमुख, विलास शिंदे, सलीम शेख, शरद अहेर आदी उपस्थित होते.यावेळी कानिटकर यांनी संभाजीराजे यांचा खरा इतिहास जगासमोर येण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांचे संपूर्ण आयुष्य हे धगधगता संघर्ष होता, असे सांगितले.राजकारणातील विचित्र आयुष्य त्यांच्या वाट्याला आले आणि बालवयात आलेल्या अनुभवातून ते सशक्त झाल्याचा प्रसंग आग्रा भेटीदरम्यान दिसून आला. मुगलांच्या चाकरीत मोठे होत असतानाही त्यांच्यातील स्वाभिमान अनेक घटनेप्रसंगी समोर आल्याची उदाहरणे कानिटकर यांनी यावेळी दिली.छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन बादशाहाच्या आग्रा दरबारात गेले तेव्हा पिता म्हणून शिवाजी महाराजांच्या मनातील घालमेल कानिटकर यांनी अधोरेखित केली. संभाजी राजेंच्या सुरक्षिततेसाठी शिवाजी महाराजांना वेळोवेळी घ्याव्या लागलेल्या काही भूमिकांचे कानिटकर यांनी भावनिक वर्णन केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक व्याख्यानाचे आयोजक नगरसेवक शाहू खैरे यांनी केले. सूत्रसंचालन अनुराधा बस्ते यांनी केले.शस्त्र प्रदर्शनया व्याख्यानमालेनिमित्त कालिदास कलामंदिरात शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात शिवकालीन ढाल, तलवारी, कट्यार, दांडपट्टे आदींसह पुरातन कुलपे, कुºहाडी, आरसे आदींचा समावेश होता. प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती.छत्रपतींच्या वारसांचा गौरवया व्याख्यानमालेप्रसंगी तीन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसांचा गौरव करण्यात येणार आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी व्याख्याते प्राध्यापक सचिन कानिटकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी मोरोपंत पिंगळे यांचे वारस नाशिक शहरातील मनोज पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवाजी महाराज यांच्या काळातील किल्लेदार गंगाजी ऊर्फ गोबाजी मोरे यांचे १३वे वंशज हतगडचे जगदीश मोरे देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
संभाजी राजेंच्या स्वभावातच स्वाभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:11 AM
संभाजी राजे यांच्या वाट्याला विचित्र आयुष्य आले आणि त्यातून ते कणखर तसेच समृद्ध होत गेले. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्यात स्वाभिमान दिसत होता; त्यातूनच त्यांनी सोसलेले आयुष्य क्रांतिकारी घडले, असे प्रतिपादन क्रांतीशाहीर प्राध्यापक सचिन कानिटकर यांनी केले.
ठळक मुद्देधगधगते शंभूपर्व : सचिन कानिटकर यांचे व्याख्यान