निफाड : रानवड साखरकारखाना सुरू व्हावा म्हणून मागील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्याने हा कारखाना सुरू झाला , या कारखान्याचे शेतकरी सभासद आणि कामगार यांच्यासाठी हा कारखाना कोणीही सुरू करणार असेल तर त्यांना आमचे सहकार्यच राहील. सरळ मार्गाने जर कारखाना चालू होणार नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लढायला तयार आहे , असे प्रतिपादन युवक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी केले. रानवड सहकारी साखर कारखान्यावर निफाड तालुक्यातील नेते व शेतकरी कामगार यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात रानवड कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा असा ठराव झाला होता. त्या पाशर््वभूमीवर भूमीका स्पष्ट करण्यासाठी निफाड येथे मंगळवारी (दि.१४) स्वाभिमानी शेतकरी संघटना व कामगार यांच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत वडघुले बोलत होते. वडघुले पुढे म्हणाले रानवड कारखाना चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा उभारन्याची वेळ आली तर त्या वेळी कामगारांनीही लढ्यात सहभागी व्हावे ,संघर्ष करायची तयारी ठेवावी,तरच न्याय मिळेल खासदार राजू शेट्टी जिल्ह्यात येणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडून यामध्ये त्यांचे सहकार्य घेऊ असे ते म्हणाले.रानवड सहकारी साखर कारखाना कोणीही चालवायला घ्या त्याला आमचा आक्षेप नाही आमचे सहकार्यच राहील पण कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना राज्याच्या साखर उद्योगाच्या धोरणांनुसार १ आॅक्टोबरलाच सुरू करा अशी एकमुखी मागणी रानवड सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी वर्गाने यावेळी केली. याप्रसंगी , जिल्हाध्यक्ष सोमनाथ बोराडे, राजेंद्र मोगल, ए टी शिंदे, कामगार युनियन अध्यक्ष बळवंत जाधव, सुधाकर मोगल, साहेबराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ बोराडे म्हणाले रानवड कारखाना बंद असताना तालुक्यातील राजकीय व्यक्ती या विषयावर एक शब्दही बोलत नव्हते परंतु ५ आॅगस्टला रानवड येथील मेळाव्याला सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते . मात्र रानवड कारखाना चालू व्हावा म्हणून वेळोवेळी लढा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या मेळाव्याचे आमंत्रण दिले नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. राजेंद्र मोगल म्हणाले तालुक्यातील मुख्य नेत्यांना एकत्रित करून सर्वाना विश्वासात घेऊन याबाबत दिशा ठरवावी. कारखान्याचे कर्मचारी शिवराम रसाळ म्हणाले , कारखाना सभासदांनी चालवावा असा ठराव झाला आहे ,प्रत्येक कामगारांचे ४ ते ५ लाख रु कारखान्याकडे घेणे आहेत, ५ आॅगस्ट रोजी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या मेळाव्यात या कारखान्याला फक्त ५ कोटी रु देणी असल्याचे सांगण्यात आले त्यात त्रृटी असून जवळपास २२ कोटी रु पये देणे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मार्च २०१२ पासून आजपर्यंत६०० कामगार निवृत्त झाले त्यांना ग्रॅज्युटी रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. यावेळी सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, रासाका युनियन अध्यक्ष बळवंत जाधव ,ए टी शिंदे, कामगार युनूस उस्मान शेख ,अरु ण कुशारे,त्र्यंबक चव्हाणके,भाऊसाहेब तासकर, साहेबराव शिंदे, सुधाकर धारराव, बाळासाहेब काशीद, सुभाष गायकवाड यांनीही आपली भूमिका मांडली याप्रसंगी रानवड कारखान्याचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रासाकासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना लढायला तयार - हंसराज वडघुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 7:55 PM