निफाड : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ६) येथील निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.निफाड मार्केट यार्ड येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आदि घोषणा मोर्चात देण्यात येत होत्या. हा मोर्चा निफाड बसस्थानक मार्गे निफाड तहसील येथे आणण्यात आला. निफाड तहसील गेटसमोर झालेल्या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढला आहे, कर्जाचा बोजाही वाढत चालल्याने शेतकरी राज्यात आत्महत्त्या करीत आहेत. ज्या तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हटले जायचे तो निफाड तालुका आत्महत्त्येचा तालुका झाला आहे. या तालुक्यात उच्चांकी शेतकरी आत्महत्त्या झाल्या आहेत. संपूर्ण देशात शेतकरी कर्जमुक्ती प्रश्नावर आम्ही शेतकऱ्याला जागे करीत आहोत. याप्रश्नी केंद्र आणि राज्य सरकार यांना आम्ही आंदोलनाद्वारे जाब विचारणार आहोत. निसाका वाचवण्यासाठी आम्ही जेव्हा जेव्हा हाक देऊ तेव्हा या लढ्यात शेतकऱ्यांनी सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद पगार, तालुका अध्यक्ष सोमनाथ बोराडे, सरचिटणीस सुधाकर मोगल, संतोष पगारे आदिंची भाषणे झाली. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन निफाडच्या निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना दिले. याप्रसंगी हंसराज वडघुले, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद पगार, साहेबराव मोरे, निवृत्ती गारे, सोमनाथ बोराडे, सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर, माधव रोटे, रमेश मोगल, प्रकाश जाधव, शिवाजी निकम, विकी आरोटे, विनोद दोशी, शिवाजी गाजरे, रामकृष्ण जाधव, रवींद्र शेवाळे, नीलेश शिरसाठ, बबन पोटे, त्र्यंबक चव्हाणके, विष्णू घोटेकर, बाळू मुरकुटे, सखाहरी निफाडे उपस्थित होते. (वार्ताहर)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
By admin | Published: April 07, 2017 12:47 AM